मियावाकी जंगल निर्मीती प्रकल्पाची सुरुवात :
जापान मधील वनस्पती शास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांनी कमी जागेत व कमी वेळेत उत्तम जंगल निर्माण करण्याची ही पद्धत १९७० मध्ये शोधून काढली. अकिरा त्या काळी योकोहामा राष्ट्रीय विद्यापीठामध्ये जंगलाच्या परिस्थीतीचा अभ्यास करत होते. त्यांच्या अभ्यासातून त्यांना लक्षात आले की देशातील ६४% क्षेत्रावरील देशी जंगल विविध करनामुळे नाहीसे झाले आहे. जपानमधील कमी होत चाललेले देशी जंगल ही मोठी चिंता त्यांना सतावत होती. यावर उपाय म्हणून त्यांनी देशी झाडांच्या बिया साठवने म्हणजेच “सिड बँक” उभारून सुरुवात केली. हळू-हळू देशी झाडांची नर्सरी तयार करून सहकार्यांसोबत जंगल निर्मीतीचे प्रयोग करण्यास सुरुवात केली. काही वर्षाच्या प्रयत्नातून त्यांनी कोणत्याही ठिकाणी जंगल उभारणीची ही यशस्वी पद्धत विकसित केली. आजवर लोकसहभागातून जपान मध्ये १३०० पेक्षा जास्त ठिकाणी मियावाकी जंगलाची उभारणी केली आहे जी देशातील ग्रीन कवर वाढवण्यासाठी मदत करत आहे. या अनोख्या जंगल निर्मिती पद्धतीस जगभरात त्यांच्या नावाने म्हणजेच मियावाकी जंगल असे ओळखले जाऊ लागले. अकिरा मियावाकी यांचे सध्याचे वय ९२ असून त्यांच्या कार्यास “अशाही प्राईज” व “ब्लू प्लानेट प्राईज” अश्या नामांकित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
भारतामध्ये Afforest, SayTrees व PEF सारख्या अनेक प्रशिक्षित संस्थांनी ही जंगल निर्मितीची पद्धत प्रसारित केली आहे. महाराष्टामध्ये ३२ शिराळा, सांगली, ठाणे, अहमदनगर, पुणे, नाशिक या ठिकाणी आपणास मियावाकी जंगल प्रकल्प पाहण्यास मिळेल. मियावाकी जंगल निर्मिती प्रकल्पास अनेक राज्य सरकारनी मान्यता देऊन प्रकल्पांची उभारणीस सुरुवात केली आहे.
प्लॅनेट अर्थ फौंडेशन चा मियावाकी जंगल निर्मिती प्रकल्पांची उभारनी करतानाचा अनुभव:
प्लॅनेट अर्थ फौंडेशन ही एक NGO म्हणजेच स्वयंसेवी संस्था आहे. संस्थेचा मूळ उद्देश स्थानिक निसर्ग संवर्धन व जनजागृती असा आहे. अनेक प्रकल्पातून संस्थेचे कार्य गेल्या पाच वर्षापासून पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे. त्यातीलच एक म्हणजे मियावाकी जंगल निर्मिती प्रकल्प. मियावाकी जंगल प्रकल्पाची सुरुवात करण्या आधी संस्था लोकसहभागातून शाळा कॉलेजे, व वन-विभागसोबत पारंपारिक पद्धतीने वृक्षलागवड करत होती. पारंपारिक पद्धतीमध्ये अनेक अडचणी जाणवून आल्या ज्यामुळे लावलेल्या वृक्षांची अपेक्षित वाढ होत नव्हती. त्याच दरम्यान संस्थेतील वनस्पती अभ्यासकांना बेंगलोर या ठिकाणी मियावाकी जंगल निर्मिती प्रकल्पाचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. या प्रशिक्षणातून मियावाकी पद्धतीचे यश प्रत्यक्षात पाहता व अनुभवता आले.
३२ शिराळा हा सांगली जिल्ह्यातील एकमेव तालुका सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि सह्याद्री व्याघ्रप्रकल्पासारखा जैवविविधतेचा ठेवा तालुक्यास लाभला आहे. परंतु खाजगी जागेतील वृक्षतोड ही शिराळा मधील मोठी समस्या आहे. निसर्ग व वृक्ष संवर्धनासाठी समाजा समोर एक शास्वत पर्याय ठेवण्यासाठी मियावाकी जंगल हा प्रकल्प संस्थेने तालुक्यात प्रस्थापित केला आहे. व त्यामुळे समाजामध्ये मोठ्यास्थरावर जनजागृती होत आहे.
मियावाकी जंगलाची निर्मिती करत असताना एकूण सहा पायऱ्यांचा वापर करावा लागतो, पुढीलप्रमाणे:
१. जैवविविधता सर्वेक्षण: प्राणी व वनस्पती शास्त्रातील विध्यार्थ्याकडून प्रकल्पाच्या जागेचे जैवविविधता सर्वेक्षण करावे. तसेच निसर्ग तज्ञांकडून प्रकल्पाची जागा निश्चित करावी.
२. वृक्षांची निवड: जैवविविधता सर्वेक्षणातून देशी झाडांची यादी तयार करावी व प्रकल्पासाठी लागणाऱ्या झाडांची निवड करून रोपांची उपलब्धता करावी.
३. उत्खनन व मशागत: प्रकल्पाच्या जागेचे मार्किग करून एक मीटर खोल जमीन खोदून घ्यावी व त्यात निवडलेल्या जैविक घटकांचे मिश्रण करून माती पुन्हा पसरून घ्यावी.
४. रोपांची लागवड: एक चौरस मीटर क्षेत्रामध्ये तीन रोपे व दोन रोपांमधील अंतर दीड फुट ठेऊन अशी लागवड करावी.
५. रोपांना आधार: रोपांना बांबूच्या काठ्यांचा आधार द्यावा व जमिनीवर भाताचे पिंजर अंत्रून घ्यावे.
६. जंगलाची देखरेख: रोप लागवडीपासून पुढील दोन वर्ष जंगलास नियमित पाणी देणे व जैवविविधतेच्या नोंदी राखणे.
याच पायऱ्यांचा वापर करून संस्थेने सिद्धिविनायक नगर, ३२ शिराळा या ठिकाणी डॉ. नितीन जाधव व डॉ. कृष्णा जाधव यांच्या आनंद हॉस्पिटल सोबत जुलै २०१९ मध्ये सांगली जिल्ह्यातील पहिल्या मियावाकी जंगलाची उभारणी केली. या जंगलास ५ जुलै २०२० रोजी एक वर्ष पूर्ण झाले व सर्व प्रकल्प टीमने जंगलाचा पहिला वाढदिवस जंगलाचे पूजन करून व केक कापून साजरा केला. एका वर्षात जंगलाची वाढ अपेक्षेपेक्षा जास्त झाली आहे. जुलै २०१९ ला जंगलाची उंची २ ते ३ फुट इतकी होती. सध्या एक वर्ष पूर्ण झालेल्या जंगलाची उंची जुलै २०२० रोजी १३ ते १५ फुट इतकी झाली असून जंगल घनदाट झाले आहे. एकूण ८००० चौरस फुट क्षेत्रात ६०० पेक्षा जास्त झाडांची लागवड करून या प्रकल्पाची उभारणी केली आहे.
हा प्रकल्प मियावाकी जंगल, फळबाग व फुलपाखरु उद्यान अश्या एकूण तीन भागात विभागला आहे. मियावाकी जंगल क्षेत्रात ५२ देशी प्रजातींची ५४० रोपे लावण्यात आलीआहेत. फळबाग क्षेत्रात २२ प्रजातीची फळझाडे आणि फुलपाखरू उद्यानात फुलांच्या रोपांच्या १८ प्रजातीची लागवड करण्यात आली आहे.
जैवविविधतेची नोंद: गेल्या वर्षभरात मियावाकी जंगलामध्ये ४१ प्रजातीचे पक्षी, २ प्रजातीचे सस्तन प्राणी, ४ सरपटणारे प्राणी, ११ उभयचर प्राणी, तसेच फुलपाखरांच्या ३४ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे ती खालीलप्रमाणेः
· पक्षी: गुलाबी फिंच, लाहोरी, बदामी घुबड, पिंगळा, मोर, लांडोर, होला, बुलबुल, साळुंखी, इत्यादी.
· सरपटणारे प्राणी: धामण, कवड्या, डुरक्या घोणस, व हरणटोळ सर्प.
· फुलपाखरे: कॉमन रोझ, टेल्ड जे, कॉमन जाजबेल ही फुलपाखरे.
· वनस्पती: पिंपळ, उंबर, वड,या फायकसच्या प्रजातीआहेत. जांभळ, रायजांभळ, करंज,आंबा, फणस या वन्य फळ देणाऱ्या प्रजाती; ताम्हण, कांचन, बहावा, पळस, काटेसावर ही वन्य फुले असणाऱ्या प्रजाती आहेत; तसेच बेहडा, हिरडा, रीठा, आवळा, कडुलिंब आणि कढीपत्ता या औषधी वनस्पती आहेत.
रसायनांचा वापर अजिबात नाही: जंगल निर्मितीसाठी सेंद्रीय पद्धत वापरली आहे. कोणतीही रासायनिक खते, कीटकनाशके वापरली नाहीत. या जंगलातून निसर्गाला व समाजाला मिलणारे सर्व उत्पादन सेंद्रिय आणि नैसर्गिक असणार आहे.
३२ शिराळा मधील दुसरा मियावाकी जंगल प्रकल्प:
गतवर्षीच्या प्रकल्पाचे यश पाहून मे २०२० पासून डॉ. दीपक यादव व डॉ. मनीषा यादव यांच्या हॉस्पीटल सोबत बायपास रोड याठिकाणी ३२ शिराळा मधील दुसऱ्या मियावाकी जंगल प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरु केले आहे. एकूण ४००० चौरस फुट क्षेत्रात ६०० देशी झाडांची लागवड करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी संस्थेचे अध्यक्ष आकाश पाटील, उपाध्यक्ष प्रणव महाजन, वैभव नायकवडी, समीर पिरजादे, अनिरुद्ध महाजन, अमित माने, डॉली ओसवाल, गावातील सहभागी स्वयंसेवक व नागरिकांचे मह्त्वाचे सहकार्य लाभले आहे.
एफोरेस्ट इंडिया या संस्थेने तयार केलेली मार्गदर्शक पुस्तिका प्रकल्पासाठी उपयुक्त ठरली. पी.ई.एफ टीमने जंगलाची साप्ताहिक व मासिक देखभाल सुरू ठेवली आहे. झाडांना पाणी देणे आणि तण काढून टाकणे ही कामे नियमित केली जात आहेत.
आतापर्यंतचा प्रतिसादः जंगलाच्या उद्घाटनानंतर वर्षभरात २५०० हून अधिक लोकांनी या प्रकल्पाला भेट दिली आहे आणि जंगलाच्या वाढीचे कौतुक केले आहे. अनेकांना या प्रकल्पातून प्रेरणा मिळाली असून त्यांनी वृक्षारोपण करणे आणि आपल्या भागातील मोठ्या वृक्षांची काळजी घेणे सुरू केले आहे. समाजामध्ये वृक्ष, जंगल व जैवविविधता संवर्धन बद्दल जागृती नीर्माण करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे आणि त्यासाठी प्रकल्प आपली भूमिका बखुबी निभावत आहे.
काही गैरसमज व विरोध: मियावाकी जंगल निर्मिती पद्धतीचा वाढता प्रतिसाद पाहता आज देशभरामध्ये अनेक ठिकाणी निसर्गप्रेमी या जंगलांची निर्मिती करत आहेत. पारंपारिक वृक्षलागवडीस ही एक यशस्वी पर्यायी पद्धत मिळाली आहे. परतू या जंगलाची निर्मिती करण्यास काही निसर्ग अभ्यासकांचा विरोध आहे. त्याची काही कारणे पुढील प्रमाणे आहेत: मियावाकी जंगलाची चुकीच्या ठिकाणी लागवड, लागवडीसाठी योग्य झाडांची निवड होत नाही, ही जपानी पद्धत आहे, तसेच हे जंगल नैसर्गिक जंगलाची जागा घेऊ शकत नाही. हे काही मुद्दे नक्कीच महत्वाचे आहेत. त्यामुळे ज्यांना मियावाकी पद्धतीने जंगल निर्मिती करायची आहे त्यांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी:
१. मियावाकी जंगलाची योग्य ठिकाणी लागवड: मोकळे डोंगर, माळरान, गवताळ प्रदेश, पाणथळ प्रदेश असलेली जागा या प्रकल्पासाठी निवडू नये. कारण त्या ठिकाणी अनेक प्राणी, पक्षी, साप, सरडे, बेडूक, किटक अश्या देशी प्रजातींचा नैसर्गिक अधिवास(Habitat) व परिसंस्था(Ecosystem) असण्याची शक्यता आहे. देशी प्रजातींच्या आदिवासातील बदल हा त्यांच्या संख्येत व इतर परिसंस्थेमध्ये बदल करतो. हा बदल हानिकारक होऊ शकतो. त्या व्यतिरिक्त शेत जमीन, घराशेजारी, सोसायटीमध्ये, MIDC मधील कारखाने, कंपनी शेजारी, शाळा- कॉलेज व विद्यापीठांच्या आवारात, महानगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात, तसेच विविध देवस्थानच्या आवारात मियावाकी जंगलाची उभारणी करणे उत्तम राहील. प्रकल्पाची जागा निवडताना त्या ठिकाणच्या जैवविविधतेचा अभ्यास करणे व निसर्ग तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
२. लागवडीसाठी योग्य झाडांची निवड करावी : प्रकल्पाच्या जागेतील व आसपासच्या परिसरातील जैवविविधतेचा अभ्यास करावा. प्रकल्पासाठी स्थानिक झाडांची रोपे उपलब्ध करावीत. विदेशी झाडांची रोपे या प्रकल्पात लाऊ नयेत. देशी झाडांची स्थानिक जैवविविधतेला मदत होते.
३. ही शास्त्रीय पद्धत आहे : अकिरा मियावाकी या वनस्पती शास्त्रज्ञानी ही पद्धत जपान या देशात नक्कीच निर्माण केली आहे परंतु सध्या या पद्धतीनुसार इतर अनेक देशांमध्ये स्थानिक व देशी वृक्षांचा वापर करून यशस्वीरित्या जंगल निर्मिती केली जात आहे. त्यामुळे या पद्धतीचे मूळ जपानचे असले तरी रचना संपूर्णपणे स्थानिक व देशी जैवविविधतेला अनुसरून आहे.
४. हे जंगल नैसर्गिक जंगलाची जागा घेऊ शकत नाही: गेल्या दोन वर्षाच्या अभ्यासातून असे लक्षात आले आहे की या जंगलाच्या लागवडीनंतर जैवविविधतेतील अनेक घटक जसे कीटक, पक्षी, प्राणी, साप, सरडे, मुंग्या, कोष्टी, आणि सूक्ष्मजीव या जंगलासोबत एकरूप होण्यास सुरुवात करतात. कालांतराने या जंगलाचे रुपांतर एका उत्तम जंगल परिसंस्थेत होते व स्थानिक निसर्गास मदत होते. तसेच या जंगलाची कार्बन साठवून ठेवण्यासाठीही मदत होते.
अधिक माहितीसाठी संपर्क:
आकाश पाटील: ९४२०४४९१११, प्रणव महाजन: ९६५७४९३१६१
वेबसाईट: www.pef-india.org
प्रमुख शहरापासूनची प्रकल्पाची अंतरे:
मुंबई (३५५ कि.मी.), पुणे (२१२ किमी), कोल्हापूर (५७ कि.मी.), बंगळुरू (६४६ किमी) पासून
दी. २०/०८/२०२०, सकाळ-अग्रोवान मध्ये आलेला लेख:
Comments